Saturday, October 3, 2015

अठरा वर्षात ५० हजाराचे ८००० हजार कोटी केले !

मित्रांनो ही कथा वाचून तूम्हाला खूप मोठा धक्का बसणार आहे. एका ऐवढयाशा कल्पनेवर प्रचंड मोठी कंपनी बनूच कशी शकते? ते पण उद्योग-व्यवसायाची कूठलीही पार्श्वभूमी नसलेल्या एका मध्यमवर्गीय तरुणाकडून!


ही कथा आहे जिवंतपणीच दंतकथा बनलेल्या एका तरुणाची - व्ही.एस.एस.मणीची! त्याचा जन्म एका पारंपारिक मध्यमवर्गीय तमिळ ब्राम्हण कुटूंबात झाला. वडील कोलकत्ता या शहरात नोकरी करत होते तर आई गृहिणी होती. मणी चार बहिण भावंडांमध्ये सगळ्यात मोठा. घरात शिक्षणाचे वातावरण. त्यामुळे मुलांनी शाळा कॉलेजात मन लाऊन अभ्यास करावा, भरपूर  गुण मिळवावेत आणि चांगली सुरक्षित नोकरी पटकावावी हा नोकरदार संस्कार. त्याच सगळ बालपण कोलकत्त्यात गेल. पुढे वडील नोकरीनिमित्त दिल्लीला आले, सगळ कुटुंब दिल्लीला हलवलं. दरम्यान मणीने पदवी पूर्ण केली होती आणि चार्टर्ड अकाऊंटंटचे शिक्षण घेत होता. हे शिक्षण चालू असताना वडिलाची नोकरी गेली. कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. मणीला शिक्षण अर्धवट सोडावे लागले. घरात आर्थिक हातभार लावण्यासाठी त्याने एका यलो पेजेस कंपनीत सेल्सपर्सन म्हणून नोकरी सुरु केली.

यलो पेजेस म्हणजे उद्योग-व्यवसायांची नाव, पत्ता व फोन नंबर यांची यादी असलेले एक मोठे जाडजूड छापील पुस्तक. प्रत्येक मोठे शहर किंवा जिल्ह्यासाठी स्वतंत्र पुस्तक. जर एखाद्याला उद्योग व्यवसायाचा पत्ता हवा असेल तर तो त्या यादीत शोधणार.

या कामासाठी मणीला अनेक ग्राहकांना भेटावे लागायचे. त्यातील एका ग्राहकाने सुचवले की पत्ता शोधणार्यासाठी हे किती कटकटीचे काम आहे. त्यापेक्षा असा हवा असलेला पत्ता आपल्याला फोनवर मोफत मिळाला तर?

बस्स! याच एका कल्पनेवर मणी, तो ग्राहक आणि एक मित्र अशी तिघांनी १९८९ साली आस्क मी नावाने कंपनी सुरु केली. माहिती हवी असलेल्या ग्राहकाच फोन आला की माहिती देताना जाहिरातदाराच्या माहितीला  प्राधान्य द्यायचे. जाहिरातीतून उत्पन्न मिळणार. कंपनीची सुरवात तर चांगली झाली, पण लवकरच भारतीय अर्थव्यवस्थेत मंदी आली आणि कंपनीला त्याचा फटका बसला. तोटा सुरु झाला. भागीदारांबरोबर मतभेद होत होते, शेवटी तो १९९२ साली त्यातून बाहेर पडला.

पुढे चार वर्ष त्याने इतर धडपड केली. पण रात्रंदिवस मात्र  स्वतःची टेलिफोनवर मोफत पत्ते सांगणारी कंपनी सुरु करायची याची स्वप्ने पाहत होता. त्याचे आदर्श होते धीरूभाई अंबानी आणि टाटा! त्यांच्यासारखच एक दिवस आपण पण खूप मोठ बनायचंच हा त्याचा निर्धार पक्का होता. लाखो लोक आपल्या कंपनीची सेवा घेत आहेत अस भव्य चित्र तो तपशीलवार रंगवायचा.

१९९६ ला त्याने मुंबई गाठली आणि ५०,००० रु. गुंतवून जस्ट डायल नावाने कंपनी सुरु केली. ग्राहकांच्या सहज लक्षात राहील असा टोल फ्री नंबर मिळविला ८८८-८८८८. भांडवल खूपच कमी असल्याने जागा, फर्निचर, कॉम्प्यूटर, सगळ-सगळ भाडे तत्वावर घेतल. गल्लीबोळात माणसे पाठवून वेगवेगळ्या उद्योगधंदे व्यवसायांची माहिती गोळा केली. खूप संघर्ष करावा लागला. पत्नीचे दागिने गहाण ठेवावे लागले. पण कंपनी बंद करण्याचा विचार कधीच केला नाही. नेटाने, चिवटपणे तो लढत राहिला.

हळू हळू कंपनीची कीर्ती माऊथ पब्लिसिटीने सगळीकडे पसरू लागली तस तशी कंपनी पण विस्तारत गेली. कंपनी वाढवताना मणीने फक्त एकाच गोष्टीचा विचार केला, तो  म्हणजे - मी ग्राहकाला जास्तीत जास्त चांगली सेवा कशी देऊ शकतो? रोज मी त्यात काय सुधारणा करू शकतो?

फक्त या सूत्रावर कंपनी इतकी मोठी झाली की २०१३ साली कंपनी शेअर बाजारात नोंदवली गेली. अमिताभ बच्चन सारखी हस्ती त्यांच्यासाठी ब्रँड अँबेसिटर म्हणून काम करू लागली. २०१४ मध्ये कंपनीचे मूल्य होते ८००० कोटी रुपये! आता अमेरिकेसह अनेक देशांमध्ये त्यांचा कारभार पसरला आहे. ती आता एक बहुराष्ट्रीय कंपनी बनली आहे.

१९९६ ते २०१४ - अठरा वर्षात ५० हजार ते ८००० हजार कोटी रुपये आणि कल्पना काय तर गल्लीबोळातील उद्योग व्यवसायाची माहिती फोनवर मिळणार! चला तर, अशीच एखादी भन्नाट कल्पना तुम्हाला सुचतीय का बघा! म्हणजे तुमच्यावर पण असाच प्रेरणादायी लेख लिहायची संधी मला मिळेल!! देणार ना मला ही संधी?